Saturday, February 25, 2006

समांतर...



खरं म्हटल्यास ,लहानपणापासूच माझ्या 'भविष्य' किंवा 'नशीब' ह्या गोष्टींवर विश्वास नाही. अर्थात असा समज करून देण्यामागे, वृत्तपत्रात छापून येणा-या दैनिक/साप्ताहीक राशीभविष्याचाही हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण तरीही टाईम्स ऑफ़ इंडीया मध्ये येण्या-या दैनिक भविष्याने जवळजवळ दररोज बिनचूक भविष्य सांगून माझ्या मनातला संभ्रम वाढवण्यासही मदत केली हे ही खरं.

आत्ता ह्यात, जे चाललय , ते कमीच म्हणूम की काय ,एके दिवशी माझी पत्रिकाच माझ्या हातात पडली . त्यात मी पुढील ओळ वाचली ,'तुम्हाला तीन कन्या आणि एक पुत्ररत्न होण्याचा योग संभवतो.....'
... आणि हे वाचल्यानंतर , बापरे !!!… , पुन्हा चुकून एकदाही त्या पत्रिकेला हात लावण्याची माझी हिंम्मत झाली नाही....( कदाचित स्वत:ची पत्रिका पहाण्याचा योग माझ्या पत्रिकेतही एकदाच असावा !!! )

(सगळेच जसे हळू हळू मोठे होतात तसच ) मी सुद्धा हळूहळू मोठा होत गेलो आणि 'रम्य ते बालपण’' असे म्हणण्याची वेळ नकळत एके दिवशी माझ्यावर येऊन ठेपली.त्यावेळी परिस्थिती एकूणच जरा कठीण होती, (कुठली ते जाऊ द्या) .... पण मला व्यवस्थित आठवतं, वृत्तपत्रात वाचल्याप्रमाणे माझ्या राशीला त्यावेळी साडेसाती चालू होती. साडेसातीत बरेचदा बरे/वाईट अनुभव येतात, असं मी ऐकलं होतं, पण त्याची प्रचितीही आता येऊन गेली होती. ईश्वरकृपेने परिस्थिती हळू हळू निवळली. पण जाता जाता ज्योतिषांनी की आणखीही कुणी म्हटल्याप्रमाणे साडेसाती मलाही बरंच काही शिकवून गेली होती....

अशा सगळ्या घटनांनतर,भविष्य कितपत खरं, कितपतं खोटं ह्या गोष्टीवर पुन्हा एकदा मनात वादंग चालू झाला. असाच विचार करत अथंरूणावर पहूडलेलो असताना, अचानक मी 'युरेका ... युरेका' असं म्हणत उठलो. कारण माझ्या दृष्टीने माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं होतं....

मला काय उत्तर मिळालं ,हे जाणून घ्यायची तुम्हालाही उत्सुकता असेलच. सांगतो....

मी बारावीत असताना, आम्हाला गणितामध्ये Probability ('मराठीत आपण त्याला 'शक्याशक्यता' असे म्हणू') नावाचा एक वेगळा विभाग होता. मला व्यवस्थित आठवतं, आम्हाला असलेली गणितं ही अशी होती. 'समजा ,एका खोक्यामध्ये चार चेंडू आहेत, हिरवा, पिवळा, लाल आणि निळा आणि समजा डॊळे बंद करून (Randomely) त्यातला एक चेंडू काढला ,तर तो लाल असण्याची शक्यता काय ?? इथे गणिताच्या नियमाप्रमाणे, Set of Possible Events (घडू शकण्या-या गोष्टींचा संच) = {लाल, हिरवा, पिवळा, निळा} ,हा आहे . ह्या बाहेरची कुठलीही शक्यता इथे अस्तित्वात नाही. म्हणूनच ४ शक्यतांपैकी कुठलीही एक शक्यता खरी होण्याची शक्यता चारपैकी एक किंवा १/४ आहे.....

असो,.... पुढे अभियांत्रीकीचे शिक्षण घेताना हा विषय अधीक खोलात शिकण्याची संधी मला मिळाली.अभियांत्रीकी मध्ये अधिकाधिक कठीण अश्या Random Events ची शक्याशक्यता वर्तवण्यासाठी आम्ही वेळोवेळी Probability चीच मदत घेतली.

माझ्यामते भविष्य हे शास्र Probability शी खूपसं समांतर आहे. Probability मध्ये जसा घडू शकणा-या घटनांचा एक संच असतो, तसच काहीसं भविष्याबाबतीतही असतं. ज्योतिषी आपल्याला घडू 'शकणा-या' गोष्टींची एक 'कल्पना' देतो.पण माझ्या मते, त्याची परिणीती ही आपल्यावरच अवलंबून असते.

उदाहरणादाखल मगाशी उल्लेखिलेल्या चेंडूचे उदाहरण घेऊ. समजा तुम्ही चार चेंडूमधला एक चेंडू निवडण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष करत आहात. ( पण आत्ता हे लक्षात असू द्या ,की प्रत्यक्षात कृती करताना तुमचे डोळे उघडे आहेत, म्हणजेचं तुमचा मेंदूही काम करतोय ) आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचा चेंडू निवडला आहे . आता अजूनही गणिताच्या नियमाप्रमाणे कुठल्याही रंगाचा चेंडू निवडला जाण्याची 'शक्यता' पूर्वी इतकीच आहे ,पण रंग कुठला हा 'निर्णय' आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे .

वैयक्तिक भविष्याचही तसच आहे. जगामध्ये असणा-या/घडणा-या सगळ्या गोष्टींचा आणि कालानारूपे बदलणारा एक Random संच असतो (Set of possible events). आत्ता आपल्या रोजच्या आयुष्यात कुठल्या गोष्टी घडतील , हा त्यातील एक उपसंच (Subset) झाला. ज्योतीष हे एक असं शास्त्र आहे ,जे प्रत्येक व्यक्तिसाठी हा उपसंच Define करतं की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात घडणा-या 'शक्यतांचा'(योगांचा) समावेश आहे.शेकडॊ वर्षाचे काम ह्या शास्त्रावर झाले असल्याने, हे शास्त्र वास्तवाच्या फ़ार जवळ जातं, पण माझ्यामते अजूनही ती एका मर्यादेपर्यंत 'शक्यता'च रहाते. ही मर्यादा परिस्थितीला अनुसरून आहे.'शक्यता' आणि 'परिणीती' ह्यात असलेलं अंतर प्रत्येक जण आपल्या कृतीने भरून काढतो. मोठमोठ्या भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेली भविष्य चुकल्याचं आपण ऐकतो/वाचतो ते ह्या कृतीतील फ़रकामुळेच !!!!

जगातली बरीचशी यशस्वी माणसं 'लक फ़ॅक्टर 'चं महत्व नाकारत नसले तरी त्यांचा भर 'Hardwork' आणि 'Attitude' वर असतो. अयशस्वी माणसांच बरेचदा ह्या उलट .... कदाचित तुम्हालाही असा अनुभव आला असेल.

आपल्या निर्णयांवर परिस्थितीचा प्रभाव जरी असला ,तरीही ते आपल्या सद्सदविवेक बुद्धीवरच अवलंबून असतात हे ही तितकच खरं. म्हणूनच 'ज्योतिष्यांनी वर्तवलेलं भविष्य' ही (माझ्या मते) केवळ शक्यता आहे ,आणि त्याचा केवळ एक शक्यता म्हणूनच विचार करावा ,हे इथे आवर्जून नमूद करावसं वाटतं . वेळप्रसंगी मनाची तयारी त्या दृष्टीने करणं किंवा तशी कल्पना करून देणं हे ही फ़ायदेशीर ठरतं, पण हे सुद्धा बरेचदा परिस्थिती सापेक्ष आहे. म्हणूनच आपल्या निर्णयांसाठी आपल्या बुद्धीवर विसंबून रहाणचं केंव्हाही योग्यच !!!

…….रहाता राहील्या हातावरच्या रेषा !! त्यांचं म्हणाल ,तर हाताच्या रेषांवरून कतृत्वाने आकार घेण्याच्या ऐवजी , कतृत्वावरून प्रेरणा घेऊन रेषांनाही आपली चाल बदलण्याचा मोह व्हावा ,असं काहीतरी करावं , खरं ना !!!!



Email- yoursyogesh@gmail.com